कोकणी कोकणा आदिवासी समाज सेवा संघ नाशिक महाराष्ट्र व आदिवासी बचाव अभियानतर्फे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना मागण्यांचे निवेदन

कोकणी कोकणा आदिवासी समाज सेवा संघ नाशिक महाराष्ट्र व आदिवासी बचाव अभियानतर्फे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना मागण्यांचे निवेदन
लक्ष्मण बागुल (९८२३७७९२०२)
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड (वणी) येथील आदिवासी पाड्यावर गावकरी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नाशिक व पंचायत समिती दिंडोरी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आदिवासी बचाव अभियानाच्या वतीने राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत व मागण्यांचे निवेदन राज्यपालांना सादर करण्यात आले.
कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी जनजागृतीपर माहिती स्टॉल्स उभारण्यात आले होते. आदिवासी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवित राज्यपालांचा गमच्छा, तीर-कमान व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश पवार, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिंडोरी तालुक्यातील ग्रामस्थ व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या कार्यक्रमामुळे दिंडोरी तालुक्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.



