जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत बोरगाव येथे भव्य रक्तदान शिबीर मानवतेच्या सेवेसाठी पुढाकार; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन

जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत बोरगाव येथे भव्य रक्तदान शिबीर
मानवतेच्या सेवेसाठी पुढाकार; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन
जगद्गुरु श्रीमद् गमानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून गमानंदाचार्य दक्षिणपीठ, नाजिधाम (महाराष्ट्र) यांच्या वतीने आयोजित जीवनदान महाकुंभ २०२६ (दि. ०४ ते १८ जानेवारी २०२६) अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील सांस्कृतिक भवन येथे दि. १५ जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ दिवस चालणाऱ्या या जीवनदान महाकुंभाच्या माध्यमातून समाजाला आवश्यक असलेल्या रक्तसाठ्याची उपलब्धता करून देण्याचा हा महान उपक्रम राबविण्यात येत आहे. मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनमोल असले, तरी ज्या दानामुळे थेट एखाद्याचे प्राण वाचतात, असे रक्तदान सर्वश्रेष्ठ पुण्य मानले जाते.
समाजात मायक्रोसाइटिक अॅनिमिया, सिकलसेल, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर यांसारख्या गंभीर आजारांशी झुंज देणारे हजारो रुग्ण आजही रक्ताच्या एका थेंबासाठी संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत रक्तदातेच त्यांच्यासाठी देवदूत ठरत आहेत. फक्त पाच मिनिटांचा वेळ आणि कुणासाठी तरी संपूर्ण आयुष्य—हा संदेश देत या शिबिराचे महत्त्व अधोरेखित करण्यात येत आहे.
रक्तदानामुळे
• एखाद्या कुटुंबाचा आधार टिकतो,
• एखादे बालक नव्याने जीवनाचा श्वास घेतो,
• एखादा रुग्ण मृत्यूच्या दाढेतून परत येतो.
या पार्श्वभूमीवर सुरगाणा तालुक्यातील तरुण, नागरिक, सामाजिक संस्था व रक्तदाते यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जीवनदान महाकुंभ २०२६ यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



