सप्तशृंगगड- नांदुरी रस्त्यावर आजपासून एकेरी वाहतूक लागू
प्रत्येक सत्रानंतर ३० मिनिटे प्रवास पूर्ण होण्यासाठी क्लिअर टाईम असणार

सप्तशृंगगड- नांदुरी रस्त्यावर आजपासून एकेरी वाहतूक लागू
प्रत्येक सत्रानंतर ३० मिनिटे प्रवास पूर्ण होण्यासाठी क्लिअर टाईम असणार
बोरगाव । लक्ष्मण बागुल
सप्तशृंग गड ते नांदुरी या रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याचे व्हाइट टॅपिंग तसेच व्हॅली साइड रिटेनिंग वॉलच्या कामामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व सुरक्षितेच्या दृष्टीने १२ जानेवारी ते १५ मार्चपर्यंत एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्याचे आदेश कळवण उपविभागीय अधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांनी दिले आहेत.
हा रस्ता डोंगराळ भागातून जात असून रस्त्याची रुंदी मर्यादित, तीव्र वळणे व उतार-चढाव असल्याने कामाच्या कालावधीत दुहेरी वाहतूक करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. रस्त्याचे काम दर्जेदार व सुरक्षित होण्यासाठी काँक्रिट टाकल्यानंतर आवश्यक क्युअरिंग कालावधी पूर्ण होणे गरजेचे असल्याने वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोंडी टाळण्यासाठी नियंत्रित वेळापत्रकानुसार वाहतूक सोडण्यात येईल. नांदुरीकडे आणि नांदुरीहून सप्तशृंग गडाकडे जाणारी वाहतूक ठराविक वेळेने सुरू करण्यात येईल. ‘क्लिअर टाईम’ ठेवण्यात येणार आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पोलिस वाहने, दैनंदिन आपत्कालीन सेवा, शालेय विद्यार्थी बस सेवांना परिस्थितीनुसार तत्काळ मार्ग मोकळा करुन देण्यात येणार आहे. सप्तशृंग गड ट्रस्ट, ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधत शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने वाहतूक नियंत्रण करावे, प्रवास कालावधी ३० मिनिटांचा आहे. एका वेळेस एकाच दिशेने वाहतूक चालू राहील. गाडी पोहोचेपर्यंत विरुद्ध दिशेची वाहतूक थांबवण्यात येणार आहे.
असे असेल वेळापत्रक
सकाळ : नांदुरी ते सप्तश्रृंग गड – ६ ते ६.३०, ८ ते ८.३०, १० ते १०.३०
सकाळ : सप्तश्रृंग गड ते नांदुरी – ७ ते ७.३०, ९ ते ९.३०, ११ ते ११.३०
दुपार : नांदुरी ते सप्तश्रृंग गड – १२ ते १२.३०, २ ते २.३०
दुपार : सप्तश्रृंग गड ते नांदुरी – १ ते १.३०, ३ ते ३.३०
सायंकाळ : नांदुरी ते सप्तश्रृंग गड – ४ ते ४.३०, ६ ते ६.३०, ८ ते ८.३० व १० ते १०.३०
सायंकाळ : सप्तश्रृंग गड ते नांदुरी – ५ ते ५.३०, ७ ते ७.३०, ९ ते ९.३०, ११ ते ११.३०
रात्री : नांदुरी ते सप्तश्रृंग गड – १२ ते १२.३०, २ ते २.३०, ४ ते ४.३०
रात्री : सप्तश्रृंग गड ते नांदुरी – १ ते १.३०, ३ ते ३.३०, ५ ते ५.३०



