आपला जिल्हा
वणीत दामोदरनगर परिसरात उघड्यावर मद्यपानाने संताप

वणीत दामोदरनगर परिसरात उघड्यावर मद्यपानाने संताप
वणी येथील दामोदरनगर परिसरातील डायमंड आर्केडजवळील देशी दारू दुकान आणि वाईन शॉपमुळे नागरिक त्रस्त झाले असून उघड्यावर मद्यपान, गोंधळ, शिवीगाळ आणि भांडणांमुळे स्थानिकांचा संताप वाढला आहे. रोज संध्याकाळनंतर या परिसरात मद्यपींची गर्दी वाढते. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रकारांमुळे परिसरातील नागरिक, विशेषत: महिला व विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
परिसरात असलेल्या जिमला येणाऱ्या महिला आणि मुलींना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत असल्याची विनवणी नागरिकांनी केली आहे. अनेक वेळा विरोध दर्शवूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे. पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पोलिसांची गस्त वाढवणार
दामोदरनगर परिसरात मद्य विक्री दुकानांच्या आसपास वाढलेल्या उघड्यावर मद्यपान, धिंगाणा आणि शिवीगाळ याबाबत मिळालेल्या तक्रारी गांभीर्याने घेण्यात आल्या आहेत. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल. परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात येईल.
— गायत्री जाधव,
सहायक पोलिस निरीक्षक, वणी



