कुकुडणेतील जिओ टॉवर शोभेची वस्तू ठरला; आठ दिवसांत सेवा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

कुकुडणेतील जिओ टॉवर शोभेची वस्तू ठरला; आठ दिवसांत सेवा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
कुकुडणे येथील जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर सध्या केवळ शोभेची वस्तू ठरत असून गेल्या आठ दिवसांपासून नेटवर्क अत्यंत कमी येत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सतत कॉल ड्रॉप, इंटरनेट सेवा ठप्प होणे यामुळे दैनंदिन व्यवहार, ऑनलाइन कामकाज तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक काम मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे.
कुकुडणे येथील जिओ टॉवरची रेंज अपुरी असल्याने देशमुखनगर, फणसपाडा, महालपाडा, बोरचोंड, गुही, सोनगीर, करंजुल (क), चिंचपाडा आदी परिसरातील ग्रामस्थांनाही नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही कंपनीकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
येत्या आठ दिवसांत जिओची सेवा सुरळीत न झाल्यास रवींद्र जाधव, भागवत जाधव, सुरज शेवरे, संतू ठाकरे, ऋतिक महाले, निर्मला चौधरी आदींच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला आहे. नागरिकांनी तात्काळ तांत्रिक दुरुस्ती करून नेटवर्क पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.



