बुबळी ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामकाजाची दखल

बुबळी ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन
पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामकाजाची दखल
सुरगाणा तालुक्यातील बुबळी ग्रामपंचायतीस आयएसओ (गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन प्रणाली) मानांकन प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीने आरोग्य, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन, आरोग्यविषयक जनजागृती, महिला सबलीकरण, शुद्ध पाणीपुरवठा, विविध विकासात्मक बांधकामे, ग्रामपंचायत लेखा अद्ययावत ठेवणे, सामाजिक जोपासना, कृषी तसेच बालविकास या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट व दर्जेदार कामगिरी केल्याबद्दल हे मानांकन प्रदान करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता, शिस्तबद्ध नियोजन व नागरिकाभिमुख सेवांवर भर देण्यात येत असून, गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन प्रणालीचा प्रभावी अवलंब करण्यात आला आहे. आयएसओ मानांकनामुळे बुबळी ग्रामपंचायतीच्या विकासात्मक कामांना नवी दिशा मिळाली असून, भविष्यात अधिक दर्जेदार, पारदर्शक व लोकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.
या यशामध्ये ग्राम विकास अधिकारी गणेश गावित यांचे विशेष योगदान लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात सुधारणा होऊन विविध विभागांतील कामे वेळेत व गुणवत्तेने पूर्ण झाली. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालकांनीही आयएसओ मानांकन प्रक्रियेत परिश्रम घेत मोलाचे योगदान दिले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी जे. टी.सूर्यवंशी, विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ, सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.



