नाना–नानी पार्कला विरोध… खोट्या सह्यांची प्रकरणी तुफान संताप
अभोणा ग्रामसभेत पितळ उघड; नागरिक आक्रमक

नाना–नानी पार्कला विरोध… खोट्या सह्यांची प्रकरणी तुफान संताप
अभोणा ग्रामसभेत पितळ उघड; नागरिक आक्रमक
दिनांक ४ डिसेंबर रोजी झालेल्या अभोणा ग्रामसभेत पुन्हा एकदा गोंधळ, अव्यवस्था आणि निवडक लोकांची उपस्थिती अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. ग्रामपंचायतीच्या वारंवार तहकुब होत असलेल्या सभांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून, यावेळीही अवघे ३० ग्रामस्थ उपस्थितीत ग्रामसभा पार पडली.
निवासी कर प्रस्तावाला नागरिकांचा तीव्र विरोध
ग्रामपंचायतीच्या वतीने निवासी मालमत्ता कराबाबत सादर केलेला प्रस्ताव गावकऱ्यांनी स्पष्टपणे नाकारत, सरसकट ५०% करमाफी तात्काळ लागू करावी, अशी ठाम मागणी सभेत करण्यात आली. आर्थिक नियोजनातील त्रुटी, चुकीचे करनिर्धारण आणि नागरी सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला धारेवर धरले.
ओपन स्पेस विकासासाठी दाखल अर्ज ३ महिने दाबून ठेवला
गावातील एकही ओपन स्पेस किंवा मुलांसाठी बगीचा विकसित न केल्याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर गिरणाई सामाजिक संस्था, अभोणा यांनी सिडको प्रभाग १ मधील गट क्र. १३३ जवळील ओपन स्पेसवर नाना-नानी पार्क व बगीचा विकास करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल केला होता.
परंतु हा अर्ज जवळपास ३ महिने ग्रामपंचायतीत दडपून ठेवण्यात आला, अशी गंभीर तक्रार सभेत करण्यात आली. नागरिकांच्या मते, चांगल्या कामाला जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत.
सदस्याकडून खोट्या सह्या जमा करून खोटा अर्ज!
या प्रकरणाला वादग्रस्त वळण मिळाले ते एका ग्रामपंचायत सदस्याने केलेल्या कारस्थानामुळे.
याच प्रभागातील काही नागरिकांना दिशाभूल करून, “ओपन स्पेसवर कब्जा होईल”, “जमीन हडपली जाईल” अशा खोट्या समजुती पेरून त्यांच्या नावाने खोट्या सह्या जमा करून खोटा अर्ज तयार केल्याचे उघड झाले.
गिरणाई संस्थेचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला अर्ज ग्रामसभेत मांडायचा राहतो, पण त्याच सभेच्या आदल्या दिवशी विरोधासाठी खोटा अर्ज तयार करून सादर होतो, ही बाब ग्रामस्थांच्या मनात संशय निर्माण करणारी ठरली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर — ‘पार्क आवश्यक’
अभोणा शहरात सध्या बिबट्याचा वाढता वावर हा गंभीर प्रश्न बनला आहे. वयोवृद्ध, महिला, लहान मुले यांना सुरक्षितपणे फिरण्यासाठी, खेळण्यासाठी गावात एकही व्यवस्थित बगीचा किंवा ओपन स्पेस उपलब्ध नसल्याने नाना–नानी पार्कची गरज नागरिक मोठ्या प्रमाणात व्यक्त करत आहेत.
“सदस्याची मानसिकता खुजी” — सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप
गिरणाई संस्थेच्या उपक्रमाला अडथळे आणण्यासाठी हा डाव रचण्यात आला, असा आरोप प्रभाग क्र. १ मधील सामाजिक कार्यकर्ते रुपेश गवळी यांनी केला.
त्यांच्या मते —
“लोकांच्या हिताचे काम थांबवण्यासाठी खोटे अर्ज, खोट्या सह्या घेणे ही अत्यंत नीच आणि खुजी मानसिकता आहे. ग्रामपंचायत कामकाजात पारदर्शकता नसल्यामुळे विकासाचे प्रश्न मागे पडत आहेत.”
ग्रामस्थ आक्रमक — लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलनाची चेतावणी
सभेत उपस्थित अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली.
नागरिकांचा ठाम सूर :
३ महिन्यांचा अर्जाचा विलंब — चौकशी होऊ द्या
खोट्या सह्यांवर आधारित अर्ज तात्काळ रद्द करावा
ओपन स्पेस विकास तातडीने मंजूर करावा
ग्रामपंचायतीने पारदर्शकता आणि नियोजन दाखवले पाहिजे
काही नागरिकांनी पुढील ग्रामसभा होईपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचीही सूचना दिली आहे.



