आर्थिक सुरक्षा चक्र योजना : ग्रामीण कुटुंबांसाठी सुरक्षिततेचे कवच
डाक विभागाचा घराघरात आर्थिक सर्व्हे उपक्रम

€आर्थिक सुरक्षा चक्र योजना : ग्रामीण कुटुंबांसाठी सुरक्षिततेचे कवच
डाक विभागाचा घराघरात आर्थिक सर्व्हे उपक्रम
ग्रामीण कुटुंबांचे आर्थिक सबलीकरण करण्यासाठी भारतीय डाक विभागाने ‘आर्थिक सुरक्षा चक्र’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रायोगिक स्वरूपात नाशिक विभागात सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत शाखा डाकपाल व ग्रामीण डाक सेवक ग्रामीण भागातील प्रत्येक घराला भेट देऊन आर्थिक सर्व्हे करणार आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला योग्य बचत, गुंतवणूक, विमा आणि पेन्शन योजनांची माहिती देत त्यांचे आर्थिक संरक्षण मजबूत करणे हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
डाक विभागाच्या दीडशे वर्षांच्या विश्वासार्ह परंपरेला अनुसरून आता पारंपरिक सेवांपलीकडे जाऊन आर्थिक मार्गदर्शनाची भूमिकाही डाक विभाग निभावत आहे, अशी माहिती प्रवर डाक अधीक्षक प्रफुल्ल वाणी व सहाय्यक अधीक्षक योगेश शिंदे यांनी दिली.
उपक्रमांतर्गत खालील आर्थिक साधनांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे—
- बचत खाते, आरडी, पीपीएफ
- डाक जीवन विमा
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
- अटल पेन्शन योजना
- इतर गुंतवणूक आणि विमा सुविधा
नाशिक विभागात सुरू झालेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांना सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचे पर्याय समजून घेण्यास मदत होणार आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी हा ‘आर्थिक सुरक्षा चक्र’ योजनेचा गाभा असून, लवकरच डाक कर्मचारी प्रत्यक्ष भेटींद्वारे नागरिकांना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. डाक विभागाने सर्व नागरिकांना या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.


