साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून सुरत येथून घरी परत येत असतांना साक्री तालुक्यातील कातरणी गावाजवळ भरधाव कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक तोडून पुलावर जावून धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात उमराणे येथील एका विवाहितेसह साखरपुडा झालेला मुलगा व त्याची आई असे ३ जण जागीच ठार झाले. या घटनेने उमराणे परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उमराणे येथील माऊली मेन्स वेअरचे संचालक गणेश बाजीराव पगारे हे पत्नी प्रतिभा यांच्यासह कार क्र. एम.एच.-१५-बी.एफ.-८८१४ ने प्रतिभा यांचा चुलतभाऊ विजय जाधव यांच्या साखरपुड्यासाठी मालपूर-कासारे येथून विजय, त्यांची आई प्रमिला जाधव, महेंद्र जाधव, आणि संकेत जाधव यांना घेऊन सुरत येथे गेले होते. दुपारी साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर रात्री सुरतहून परत येत असताना, मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील कातरणी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडर तोडून पुलाला जावून धडकली.
धडक इतकी भीषण होती की, प्रतिभा पगारे, विजय जाधव आणि प्रमिला जाधव यांना डोयाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महेंद्र जाधव आणि संकेत जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मांडीवर बसलेला चारवर्षीय मुलगा वल्लभ व सहावर्षीय मुलगी कार्तिकी पगारे हे बालंबाल बचावले. या अपघाताची माहिती येथे येवून धडकताच एकच खळबळ उडून नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी साक्री येथे मदतीसाठी धाव घेतली.आज दुपारी प्रतिभा पगारे यांच्या पार्थिव देहावर उमराणे येथे तर मालपूर-कासारे येथे विजय व प्रमिला जाधव या माय-लेकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांच्या अकाली निधनाने उमराणे सह मालपूर परिसरावर शोककळा पसरली आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.