वणी – सापूतारा रस्त्यावर अज्ञात वाहानाने दोन दुचाकींना उडवले.. १ ठार दोघ जखमी…
वणी- सापुतारा मार्गावर चौसाळे फाट्यानजीक अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दुसऱ्या एका दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले आहे.वणी – सापुतारा मार्गावर मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. यामध्ये हरिश्चंद्र राजहंस गायकवाड (वय 26) रा. घागबारी, ता. सुरगाणा हा जागीच ठार झाला.
तसेच त्याच अज्ञात वाहनाने अन्य एका दुसऱ्या दुचाकीस धडक दिल्याने दुचाकी वरील सुमित दिनेश गायकवाड, वय 19 व दिव्या दिनेश गायकवाड वय 18 हे बहिण-भाऊ रा. पांडरपाडा, जि. डांग हे दोघे जखमी झाले आहे. दोघेही दुचाकी ह्या वणी बाजूने बोरगांव कडे जात होत्या. तर सापुतारा बाजूकडून आयशर गाडी ही वणी बाजूकडे जात होती. धडक दिल्यानंतर आयशरचालकाने वाहन न थांबवता अपघात करुन वाहनासह पलायन केले आहे. जखमींना या मार्गावर रुग्णसेवेत असलेल्या
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्था श्रीक्षेत्र नाणीजधाम यांच्या मोफत ऍम्ब्युलन्सने त्वरीत वणी ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अजून अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले आहे. अपघातातील मयत हरिश्चंद्र गायकवाड यांचेवर रात्री उशिरा येथील ग्रामिण रुग्णालयाच शवविच्छेदन करण्यात आले. हरिचंद्र गायकवाड हे विद्युत वितरण कंपनीमध्ये कार्यरत होते. गावातील शांत व सुस्वभावी आणि घरातील कमावता युवक गमावल्यामुळे घागबारी गावावर शोककळा पसरली असून, त्याची अवघ्या 6 महिन्यांच्या मुलीचे पितृछत्र हरपले आहे. धडक देऊन पळून गेलेल्या अज्ञात वाहनाचा पोलिसांनी कसून शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.