अभोणा पोलीस ठाण्याअंतर्गत कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा

अभोणा पोलीस ठाण्याअंतर्गत कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा
नाशिक शहरात गुंडशाही-धुंडशाहीवर कडेकोट बंदोबस्त ठेवत कायदा-सुव्यवस्थेचा बालेकिल्ला उभारण्यात शहर पोलिसांना यश येत असताना, नाशिक ग्रामीण हद्दीत मात्र या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लागल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः आदिवासीबहुल कळवण तालुक्यात वाढते अवैध धंदे, गावागावातील हाणामाऱ्या आणि पोलिसी दिरंगाईमुळे अभोणा पोलीस ठाणे हद्द कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत असुरक्षिततेच्या शिखरावर पोहोचली आहे.
अभोणा शहरात चार जणांच्या टोळक्याने फायटर व काठ्या-लाठ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अल्पसंख्यांक सेलचे अभोणा शहर प्रमुख अमीर शेख यांच्यावर अमानुष हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेला दोन दिवस उलटूनही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी अभोण्यातील ज्येष्ठ समाजसेवक इकबाल शेख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दुसरीकडे, मोहमुख-अंबुर्डी येथे जमीन हक्काच्या वादातून भावकीतीलच लोकांनी रामदास बागुल यांच्या कुटुंबियांवर हल्ला केला. या घटनेत वृद्ध महिला, महिला व शाळकरी मुलांसह सहा जण जखमी झाले. मात्र घटनेनंतर दोन दिवस उलटूनही तक्रार नोंदवून घेण्यात न आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. “नाशिक मिटिंगला जातो” असे कारण देत पोलीस अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचे बागुल कुटुंबियांचे म्हणणे आहे.
देवळीकराड येथे प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादाची सखोल चौकशी न करता सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांच्यावर थेट पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने दोन निरपराध व्यक्ती अडचणीत सापडल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकारामुळे पोलिसी तपासाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण झाले आहेत.
इतकेच नव्हे तर अभोणा गावातील एका तक्रारीप्रकरणी प्रतिवादीची बाजू समजून न घेता सपोनि योगिता कोकाटे यांनी तक्रारदारांना पोलीस ठाण्यातून हुसकावून लावल्याचा आरोप होत आहे. याच प्रकरणी उषा मोरे (रा. अभोणा) यांनी ८ डिसेंबर रोजी थेट अभोणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.
एकंदरीत, अभोणा पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या मारहाणीच्या घटनांकडे सौम्य दृष्टीकोनातून व दिरंगाईने पाहिले जात असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत, तर गुंडशाही मिरवणारे अधिकच मुजोर बनल्याचे चित्र दिसून येत आहे.



