सुरगाण्यात २७ व २८ डिसेंबरला केंद्रीय प्रभारी अधिकाऱ्यांचा दौरा
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत पंचायत समितीचे सर्व विभाग सतर्क

सुरगाण्यात २७ व २८ डिसेंबरला केंद्रीय प्रभारी अधिकाऱ्यांचा दौरा
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत पंचायत समितीचे सर्व विभाग सतर्क
आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत केंद्रीय प्रभारी अधिकारी (CPO) यांचा पंचायत समिती सुरगाणा अंतर्गत दिनांक २७ व २८ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सुरगाणाच्या वतीने सर्व खातेप्रमुख, विस्तार अधिकारी यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.
दौऱ्यादरम्यान निवडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये शाळा व आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, अंगणवाडी, बचत गट व गटामार्फत चालविले जाणारे उद्योग, ग्रामपंचायत कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना आदी ठिकाणी स्वच्छता, आवश्यक नोंदी व कर्मचारी उपस्थिती सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेले उपक्रम, विविध योजना आणि FPO (शेतकरी उत्पादक संस्था) यांचा तपशील सादर ठेवण्याचे निर्देश आहेत.
स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन तसेच पाणीपुरवठा योजनांअंतर्गत सुरू असलेली कामे प्रत्यक्ष पाहणीसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भेटीदरम्यान संबंधित विभागप्रमुखांनी स्वतः उपस्थित राहावे, कोणताही प्रतिनिधी पाठवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या दौऱ्यासाठी बोरगाव, सराड, बुबळी, भदर, हट्टी, मालगव्हाण व माणी या सात ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. संबंधित सर्व विभागांनी विविध योजनांबाबतचे आवश्यक दस्तऐवज तीन प्रतींमध्ये तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आवाहन पंचायत समिती सुरगाणा प्रशासनाने केले आहे.



