पाच हजार नागरिकांमागे एक पोलीस, अपूर्ण मनुष्यबळाअभावी पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण पोलिस स्थानकातील अतिरिक्त जागा भरण्याची गरज.
कळवण रवींद्र बोरसे

पाच हजार नागरिकांमागे एक पोलीस,
अपूर्ण मनुष्यबळाअभावी पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण
पोलिस स्थानकातील अतिरिक्त जागा भरण्याची गरज.
रवींद्र बोरसे | कळवण
अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पोलीसांवर अतिरिक्त ताण येत असून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कळवण पोलीस स्थानकात सद्यस्थितीत मंजूर असलेल्या ५२ पदांपैकी १४ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याची मागणी वाढली आहे.
१९८० च्या दशकांत कळवणला स्वतंत्र पोलीस स्थानकाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी तालुक्याची लोकसंख्या एक लाखाच्या जवळपास होती. तेव्हापासून कळवण पोलीस स्थानकात ५२ कर्मचारी मंजूर आहेत. आज तालुक्याची लोकसंख्या तीन लाखांच्या जवळपास आहे. व तालुक्यात कळवण पोलीस स्थानकात ५२ व पंचवीस वर्षांपूर्वी झालेल्या अभोणा पोलिस स्थानकात ३५ पदे मंजूर आहेत. यापैकी कळवण पोलीस स्थानकात १४ पदे रिक्त आहेत व अभोणा पोलिस स्थानकात संपूर्ण पदे भरलेली आहेत.
आजमितीस तालुक्यातील लोकसंख्येचा विचार केला तर तीन लाख लोकसंख्येसाठी ७३ पोलिस आहेत. साधारण चार हजार शंभर नागरिकांमागे १ पोलिस आहे. गावांचा विचार केला तर तालुक्यात १५२ गावे असून दोन गावांसाठी १ पोलीस आहे. यावरून कायदा व सुव्यवस्थेचा विचार केला तर निश्चितच पोलीसांवर अतिरिक्त ताण असण्याची शक्यता आहे. याशिवाय न्यायालयीन कामे, समन्स, बंदोबस्त, ट्रॅफिक, साप्ताहिक सुट्टी, रजा, वैद्यकीय रजा, यात्रौत्सव, तंट्यातील मोजणीचे कामे, रात्रीची गस्त आदी कामांमध्ये व्यस्त असलेल्या पोलीसांचा विचार केला तर कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीसांची संख्या निश्चितच कमी आहे. याव्यतिरिक्त सप्तशृंगी गड देवस्थान ठिकाणी बंदोबस्त साठी लागणारे पोलिस, आणि राज्य महामार्ग रस्त्यावरील तपासणीसाठी तपासनाक्यांवरील पोलीसांचा विचार केला तर रिक्त जागा भरण्याशिवाय अतिरिक्त पोलिसांची तालुक्यात गरज आहे.
इच्छुकांची संख्या कमी :- आदिवासी बहुल भाग असल्याने याठिकाणी बदलीवर पोलिस कर्मचारी येण्यास तयार नसतात. तसेच सेवानिवृत्त, कालांतराने शासकीय बदली आदी बाबींमुळे जागा रिक्त होतात. या जागी बदली करून येण्यास इच्छुकांची संख्या कमी आहे. तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाचा विचार केला तर तिकडेच संख्याबळ कमी असल्याचे दिसते. यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण आहे.
कर्तव्य पार पाडणे महत्वाचे :- खलनिग्रहणाय संरक्षणाय या ब्रीदनुसार आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतोय. संख्याबळाचा विचार करता निश्चितच कामाचा ताण जास्त आहे. सप्तशृंगी गड आणि मार्केट, ट्रॅफिक, एनवेळी येणारे मोर्चे, इतर गुन्हे आणि ५६ गावे, पेट्रोलिंग आदी कामांसाठी तारेवरची कसरत आहे. यामुळे वरिष्ठांकडे रिक्त जागांचा अहवाल पाठविला आहे. पुरेसे अथवा अतिरिक्त संख्याबळ असले तर निश्चितच कामे लवकर होतात.
खगेंद्र टेंभेकर- पोलीस निरीक्षक, कळवण
मंजूर पदे हजर संख्या
पोलीस निरीक्षक -०१ – ०१
सहा. पो. निरीक्षक – ०१ – ००
स.पो.उपनिरिक्षक – ०६ – ०२
पो. हवालदार – १० -०९
पो. नाईक. – ०८ – ०४
पो. शिपाई – २६ – १८
एकूण संख्याबळ – ५२ – ३४


