उंबरठाण येथील जंगलात गोवंश जातीची ६ जनावरे जप्त; २१ वर्षीय तरुणाला अटक

उंबरठाण येथील जंगलात गोवंश जातीची
६ जनावरे जप्त; २१ वर्षीय तरुणाला अटक
लक्ष्मण बागुल (९८२३७७९२०२)
सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण गावाच्या शिवारातील फॉरेस्ट जंगलात गोवंशावर अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. चारा व पाणी न देता आखूड दोराने बांधून ठेवल्याने हालचालही अशक्य झालेल्या अवस्थेत पाच गायी व एका गो-ह्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी अरमान हुसेन शेख (वय २१, रा. उंबरठाण, ता. सुरगाणा) याला अटक करण्यात आली आहे.
सोमवारी (दि.१२) दुपारी सुमारे ४.३० वाजता उंबरठाण शिवारातील जंगल परिसरात गोवंश बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच सुरगाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. झाडाझुडपात दोरखंडाने अत्यंत निर्दयपणे बांधलेली जनावरे आढळून आली. आरोपीने गोवंश जातीच्या जनावरांना चारा व पाण्यापासून वंचित ठेवल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
पोलिसांनी जप्त केलेल्या जनावरांमध्ये अंदाजे दहा वर्ष वयाच्या तीन जर्सी गायी (प्रत्येकी १२ हजार रुपये), पाच वर्ष वयाच्या दोन जर्सी गायी (प्रत्येकी ८ हजार रुपये) व पाच वर्ष वयाचा एक जर्सी गो-हा (८ हजार रुपये) यांचा समावेश असून एकूण किंमत सुमारे ६० हजार रुपये आहे.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून गोवंश संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी होत आहे. याप्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात स्टे.डा. नं. २१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज कुवर, सहायक पोलिस निरीक्षक खाडे, पोलिस हवालदार दिलीप वाघ, गणेश आव्हाड या पथकाने कारवाई करण्यात आली आहे.


