

#

सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आणि परमपूज्य स्वामी वासुदेवनंदगिरी बहुरुपी महाराज यांच्या आशीर्वादाने आयोजित ‘ऋषिपूत्र विवाह सोहळा’ बुधवारी दुपारी भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला. यावेळी लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, सुवर्णा जगताप वधू वरास आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. जय जनार्दन स्वामी अनाथ व वृद्धाश्रमातील ७० वे अनाथ चिरंजीव ज्ञानेश्वर यांचा शुभविवाह सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथील शेतकरी कन्या तुळसा हिच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला.
आश्रमात वाढलेल्या माऊलीसाठी हा सोहळा केवळ विवाह नसून मानवी प्रेम, करुणा आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला. परमपूज्य स्वामी वासुदेवनंदगिरी महाराजांच्या पालकत्वाखाली वाढलेल्या माऊलीच्या विवाहासाठी परिसरातील भक्त, व्यापारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कर्मचारी, शेतकरी मातापिता मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसर साधूसंतांच्या उपस्थितीमुळे आध्यात्मिकतेने भारला होता. उपस्थित संतांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. सोहळ्याच्या यशामागे ‘अनाथांची माता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगीता गुंजाळ आणि आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ यांचे योगदान आहे. त्यांनी उपस्थित भक्त, मान्यवरांचे आभार मानले. समाजातील दुर्बल घटकांना मायेची उब देत त्यांच्यासाठी असा मंगल सोहळा आयोजित करण्याची आश्रमाची परंपरा यानिमित्ताने सर्वांच्या मनात अधिक दृढ झाली. हा पवित्र ‘ऋषिपुत्र स्वयंवर सोहळा’ खऱ्या अर्थाने प्रेम, सेवा आणि सामाजिक समरसतेचा संदेश देणारा ठरला.