दिंडोरी तालुक्यातील वणी–मुळाणे हा सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता गेल्या दोन वर्षांतच पूर्णपणे खराब झाला असून सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. डांबरीकरण झालेले हे रस्ते आता डांबरविरहित ‘चिखलाचा मार्ग’ बनले आहेत.रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखलाचे थर आणि साचलेले पाणी यामुळे वाहनचालकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत, तर पायी चालणेही कठीण झाले आहे. परिणामी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून काही ठिकाणी वाहतूक जवळपास ठप्प होते.
कळवण व चांदवड तालुक्यातील गावांना जोडणारा आणि धार्मिक स्थळ मार्कंडेय येथे जाणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमधील आर्थिक तडजोडीमुळे या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जा वापरल्याचा आरोप स्थानिक नागरिक मनोज पवार यांनी केला आहे.२०२३ मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, पण अवघ्या तीन-चार महिन्यांतच रस्ता पुन्हा खराब झाला. त्यावेळी नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधूनही ठेकेदाराच्या राजकीय दबावामुळे कोणतीच कारवाई झाली नाही.
या रस्त्यामुळे सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांना होत असून, शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मार्कंडेय ऋषी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही चिखलातून वाट काढावी लागते, तसेच विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे.स्थानिक नागरिकांनी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून प्रवास सुलभ करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.