कृषी
दिंडोरीत पाच दिवसांपासून दाट धुके; पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

£अवकाळी पावसामुळे नुकसानीत गेलेल्या शेतकऱ्यांना आता धुक्याचा नवीन फटका बसला आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून सकाळच्या वेळेस दाट धुके पडत असल्याने परिसरातील रब्बी आणि खरिपातील पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
खडकसुकेणे, मोहाडी, कोहाटे, जानोरी, खेडगाव, जोपूळ आदी परिसरात धुक्यामुळे कांदा, गहू, मका, टोमॅटो, द्राक्ष या पिकांना फटका बसत आहे. गहू, हरभरा व कांदा या पिकांसाठी असे धुके अत्यंत घातक ठरत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तसेच सुरगाणा तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकावरही या हवामानाचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
दररोज पडणाऱ्या धुक्यामुळे द्राक्ष बागांमध्ये बुरशीजन्य रोग वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सतत बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. यामुळे कीटकनाशके, औषधे आणि खतांचा खर्च झपाट्याने वाढत असून उत्पादन खर्चात मोठी भर पडत आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने हवामानातील बदल लक्षात घेऊन मार्गदर्शन व मदतीची मागणी केली आहे.