ई-पीक पाहणी शेतकऱ्यांनी स्वतः करण्याचे आवाहन

ई-पीक पाहणी शेतकऱ्यांनी स्वतः करण्याचे आवाहन
माझी शेती, माझा सातबारा – मीच लिहिणार माझा पिकपेरा या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात न जाता स्वतःच्या मोबाईलवरून ई-पीक पाहणी करावी, असे आवाहन सुरगाणा चे तहसीलदार रामजी राठोड यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत शेतकरी खातेदारांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद थेट ७/१२ उताऱ्यावर स्वतः करता येणार आहे. यासाठी डिजिटल क्रॉप सर्वे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून ते डाउनलोड करून ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी पिकपाहणी ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत केली जात होती. त्यामुळे पिककर्ज, पिकविमा, आपत्ती नुकसान भरपाई तसेच बँक कर्जासाठी पिकपेरा नोंदविताना येणाऱ्या अडचणी आता या ई-पीक पाहणी मोहिमेमुळे दूर होणार आहेत.
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करून इंस्टॉल करावे. त्यानंतर स्वतःच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन अचूक गट क्रमांक नोंदवावा. मुख्य पिकाचे छायाचित्र शेताच्या शक्य तितक्या आत जाऊन काढावे, जेणेकरून पिकाची नोंद अचूक होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई-पीक पाहणी करताना कोणतीही अडचण आल्यास संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. महसूल प्रशासनाच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी दि. २४ जानेवारी २०२६ पर्यंत आपल्या अँड्रॉईड स्मार्ट मोबाईलवरून ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असेही तहसीलदार रामजी राठोड यांनी स्पष्ट केले आहे.


