सुरगाणा तहसीलदार ॲक्शन मोडवर; वाळू तस्कर रडारवर
गुजरात राज्यातून सहा चाकी ट्रकमधून (जीजे २१ डब्ल्यू ५२३३) हा विनापरवाना महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करत सुरगाण्याकडे पावणे चार वाजता येत असताना तहसीलदार राठोड यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी शांताराम गांगुर्डे, निवडणूक नायब तहसीलदार सुयोग वाघमारे व डी. पेटावाड यांनी सुभाषनगर येथे कार्यवाही करत ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये साडेतीन ब्रॉस वाळू होती. वाळुची अनाधिकृत किंमत एक लाख रुपये इतकी आहे. कारवाई दरम्यान ट्रकचा चालक फरार झाला आहे. तहसीलदारांनी हा ट्रक ताब्यात घेऊन सुरगाणा तहसील कार्यालयात जमा केला आहे. या प्रकरणी सुरगाणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अवैध धंदे अजिबात सहन केले जाणार नाहीत. अशा प्रकारचे कोणतेही व्यवहार सुरू असल्यास थेट तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार रामजी राठोड यांनी केले आहे.