सुरगाणा तालुक्यात सोशल मीडियावर इच्छुक उमेदवारांची हवाच हवा
जनतेला करीतायत विकासाचे आश्वासन; भेटीगाठींना वेग

सुरगाणा तालुक्यात जिल्हा परिषद गटांसाठी केवळ हतगड गट अनुसूचित जमातीसाठी राखीव जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे. या गटासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून ऋषिकेश पवार, भाजपकडून समिर चव्हाण, तर सिपीएमसह इतर पक्ष व अपक्षांकडूनही अनेक नावे चर्चेत असून उमेदवाराचा अद्यापही गुलदस्ता उघड व्हायचा बाकी आहे.
निवडणुकांचे पडघम वाजू लागताच इच्छुक उमेदवारांची हालचाल वेगवान झाली आहे. सोशल मीडिया हा प्रचाराचा मुख्य मंच ठरत असून, अनेक जण फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आदी माध्यमांद्वारे जनतेसमोर स्वतःची छाप उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडून आल्यास विकास घडवून आणू असा दावा करणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ, बॅनरचा वर्षाव होत आहे.
सण-उत्सव, वाढदिवस, शुभेच्छा फलक यांच्या माध्यमातून मतदारांच्या नजरेत येण्यासाठी ‘नवीन फंडे’ वापरण्याची चढाओढ सुरू आहे. काही उमेदवार तर आपली उमेदवारी निश्चित असल्याचा भास निर्माण करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो पोस्टरवर लावून आपली ‘अनौपचारिक’ उमेदवारी जाहीर करताना दिसत आहेत.
काही उमेदवारांनी धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून जनतेत उपस्थिती वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे. तर काहींनी वाडी-वस्तीवरील भेटीगाठी वाढवून मोठे कुटुंब, गट-गणातील मान्यवर तसेच सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
सध्या निवडणूक आयोगाकडून अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी, थंडीच्या मोसमात सोशल मीडियावरील राजकीय हवा मात्र तापली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते कोणत्या इच्छुकांना उमेदवारीची माळ घालतात, हे पाहणे आगामी काळात उत्सुकतेचे ठरणार आहे.



