
थंडीमुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांत वाढ
सुरगाणा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून त्याचा परिणाम आरोग्यावर दिसू लागला आहे. सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली असून खासगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्येही गर्दी ओसंडून वाहत आहे. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
थंडीमुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्यासोबत कफाचा त्रास वाढत आहे. अलिकडील बालमृत्यूच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही कफ सिरपवर अनेक राज्यांनी बंदी घातल्याने, लहान मुलांना औषधोपचारांपेक्षा गरम पाण्याची वाफ देण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. हिवाळ्यातील गारठा मुलांच्या शरीराला पटकन जाणवतो आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. परिणामी ताप, सर्दी, खोकला, कफ अशी लक्षणे तीव्र होतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
थंडीपासून बचावासाठी स्वेटर, मफलरचा वापर करावा. वातावरणातील बदलांमुळे शरीरातील हायड्रेशनची पातळी घटते आणि त्यामुळे थकवा जाणवू शकतो. मुलांना घराबाहेर जाताना पाण्याची बाटली द्यावी. पाण्यात आवळा किंवा लिंबू घालून ते पाणी पिल्यास शरीरातील हायड्रेशन वाढण्यास मदत होते, असेही तज्ज्ञ सांगतात.
मुलांच्या शरीरातील पाण्याची कमतरता ओळखण्यासाठी त्यांच्या लघवीचा रंग महत्त्वाचा संकेत ठरतो. फिकट, हलक्या रंगाची लघवी म्हणजे शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असल्याचे द्योतक; तर गडद पिवळा रंग दिसल्यास पाणी कमी झाल्याचे संकेत पालकांनी लक्षात ठेवावेत. बदलत्या हवामानात साधे, हलके अन्न घ्यावे आणि गरम पाणी पिण्याची सवय ठेवावी. गरम पाण्याची वाफही शरीराला आराम देते.
— दिलीप रणवीर, सुरगाणा तालुका वैद्यकीय अधिकारी



