दीड कोटी रुपयांच्या मद्याची परस्पर विल्हेवाट
तीन संशयितांविरुद्ध दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल

दीड कोटी रुपयांच्या मद्याची परस्पर विल्हेवाट
तीन संशयितांविरुद्ध दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल
कादवा–म्हाळुंगी येथील परनॉड रिकार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून पाठविण्यात आलेला तब्बल १ कोटी ५३ लाख ९१ हजार ३६० रुपये किमतीचा मद्यसाठा नियोजित ठिकाणी न पोहोचविता त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रान्सपोर्ट कंपनीची फसवणूक केल्याच्या आरोपावरून तीन संशयितांविरुद्ध दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कादवा–म्हाळुंगी येथून नांदेडकडे पाठविण्यात आलेला मद्यसाठा वाटेतच परस्पर विक्री करून ठकबाजी केल्याची तक्रार मिथून चंद्रप्रकाश पांडे (मूळ रा. भटेवरा, पोस्ट कलना, ता. विंध्याचल, जि. मिर्जापूर, उत्तर प्रदेश; सध्या रा. चंद्रमणी नगर, आडगाव, नाशिक) यांनी दिंडोरी पोलिसांत दिली आहे.
तक्रारीनुसार, सदर मद्यसाठा नांदेड येथील आल्का वाईन्स (शॉप नं. १ व २, गुरुकृपा बिझनेस सेंटर, सीजी रोड, महावीर चौक, नांदेड) येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र तो तेथे न पोहोचल्याने चौकशीदरम्यान ठकबाजीचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी ट्रकचालक विठ्ठल चव्हाण (रा. घुलेवाडी, संगमनेर), ढोले ट्रान्सपोर्ट (कासारवाडी रोड, बार्शी, जि. सोलापूर) यांचे मालक तसेच संबंधित अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहेत.



