शहरात लूटमार करण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने बेड्या ठोकल्या. पेठ रोडवरील एकलव्य पोलिस प्रशिक्षण केंद्र परिसरात बुधवारी (दि. १२) मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या अटकेमुळे म्हसरूळ परिसरातील जबरी चोरीचे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्यांमध्ये शरद गोटीराम फुलारे (२९, रा. पोहेगाव ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) व योगेश दत्तात्रेय गायकवाड (२८, रा. प्रकाशनगर, सिन्नर) यांचा समावेश आहे. हे दोघे दुचाकीवर फिरत लूटमार करण्याच्या इराद्याने म्हसरूळ भागात फिरत असल्याची माहिती हवालदार प्रवीण वाघमारे व प्रशांत मरंकड यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयितांना मध्यरात्रीच ताब्यात घेतले.
संशयित एकलव्य पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ अंधारात दबा धरून बसलेले आढळले. त्यांच्या ताब्यातून एक लाख रुपये किंमतीची पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली. त्यांना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरंकड, विशाल काठे, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, नाझीम खान पठाण, मिलिंदसिंग परदेशी, महेश साळुंके, रमेश कोळी, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, अनुजा येलवे, शर्मिला कोकणी व चालक सुक्राम पवार यांच्या पथकाने केली.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.