पेठ सरकारी दवाखान्याची भीषण अवस्था उघड; मूलभूत सुविधा ठप्प
पेठ तालुक्यातील सरकारी दवाखान्याची शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या पाहणीत अत्यंत दयनीय परिस्थिती उघड झाली. दवाखान्यात पिण्याचे पाणी, शौचालये, हात धुण्यासाठी हँडवॉश यांसारख्या मूलभूत सोयींचा अभाव आढळला असून परिसरात घाण व दुर्गंधी पसरलेली दिसली. पेशंटच्या खाटांवरील बेडशीट व चादरी मळकट, खोमट वास देणाऱ्या अवस्थेत असल्याचे आढळले. दैनंदिन स्वच्छतेची कोणतीही व्यवस्था नसल्याचेही दिसून आले.
102 आणि 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका महिनाभरापासून बंद असून, टायर, बुशिंग व पिना तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे रुग्णसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. चालकांनी वेळेवर तक्रारी पाठवूनही बीव्हीजी इंडिया लिमिटेड व सुमिती कंपनीकडून दुरुस्ती न केल्याचा आरोप केला. गाड्या बंद असल्याने कर्मचारी वर्गाचा दिवस ‘खाडा’ धरला जात असून वेतनही वंचित राहत आहे.
NH848 वर सावळघाट, कोंटबी घाट परिसरात सतत अपघात वाढत असून अँबुलन्स उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिक बिकट झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. पाहणी प्रसंगी या पाहणीमध्ये श्री. पद्माकर कामडी (शिवसेना तालुका प्रमुख), श्री. नंदू गवळी (भाजपा तालुका अध्यक्ष), श्री. तुळशीराम वाघमारे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका प्रमुख), श्री. सुरेश पवार, चंद्र भांगरे साहेब, श्री. अशोक गवळी, त्रंबक कामडी, श्री. अनिल पवार, श्री. हिरामण मौळे, श्री. सुरेश गांवढे, श्री. मनोहर चौधरी (सरपंच जळे), श्री. अशोक मुकणे (सरपंच बाडगी), श्री. हनुमंत भुसारे, श्री. रघुनाथ गवळी, श्री. कुमार मोंढे, श्री. गौरव चौधरी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.